नवी दिल्ली (प्रतिनिधी) – बहुचर्चित काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राजकीय आज पूर्णपणे पडदा नाट्यावर पडला आहे. अध्यक्षपदासाठी तीन जणांनी फॉर्म भरले असले तरी मुख्य लढत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यातच होणार आहे. के. एन. त्रिपाठी यांनीसुदधा निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
खर्गे सर्वात मजबूत उमेदवार मानले जात आहेत. जी – २३ गटाच्या सर्व नेत्यांचे त्यांना पूर्ण समर्थन असल्याचे आज दिसून आले. केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, खर्गे यांनी १४, थरूर यांनी पाच आणि त्रिपाठी यांनी एक अर्ज दाखल केला आहे. उद्या शनिवारी अर्जांची तपासणी केली जाईल आणि सायंकाळी वैध अर्जाची घोषणा केली जाईल. तीन उमेदवारांमध्ये कुणीही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. सर्व स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
खर्गे हे आमचे नेते : दिग्विजय सिंह
मल्लिकार्जुन – खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची बाब स्पष्ट झाली. या स्पर्धेतील एक इच्छुक दिग्विजय सिंह यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, खर्गे हे आमचे नेते आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी त्यांच्या उमेदवारीला अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणार आहे. असेही दिग्विजय सिंह यांनी नमूद केले. ते म्हणाले की, मी आयुष्यात तीन गोष्टींशी कधीही तडजोड केली नाही. पहिले म्हणजे मी दलित आणि आदिवासींशी संबंधित मुद्दयावर कधीच तडजोड करीत नाही, दुसरे असे की जे लोक देशातील धार्मिक सलोखा बिघडवतात त्यांच्याशी मी कधीच तडजोड करीत नाही आणि तिसरे गांधी नेहरू परिवाराविषयी माझे जे नाते आहे.




