पिंपरी : सोशल मीडियाच्या ताकदीचा प्रत्यय रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात अनुभवयास मिळाला. नगरसेवक विलास माळी यांनी फ्लेक्सवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो चुकीच्या पद्धतीने छापून महाराजांच्या कार्य व उंचीचा अपमान केला. या विरोधात स्थानिक नगरसेवक संजय वाबळे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहर संभाजी ब्रिगेडच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर विरोधात आवाज उठवला. ही मोठी चूक विलास मडेगिरी यांच्या चांगलीच अंगलट आली.
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन इंद्रायणीनगर प्रभागाचे भाजपचे माजी नगरसेवक विलास मडेगिरी यांनी विजयादशमी ५ ऑक्टोबर रोजी केले होते. या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी त्यांनी आपल्या भागात लावलेल्या फ्लेक्समध्ये शिवाजी महाराजांचा फोटो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन माजी सरसंघचालकांच्या मध्ये छापला. या चुकीचे प्रकारामुळे पिंपरी चिंचवड शहरात बातमी वाऱ्यासारखे पसरले. सोशल मीडियात मडेगिरी यांच्या विरोधात उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या.
पिंपरी -चिंचवड शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे आणि माजी नगरसेवक संजय वाबळे यांना हा प्रकार कळताच त्यांनी फेसबुक व व्हाट्स अॅपवर थेट मडेगिरी यांचा मोबाईल नंबर देऊन शिवप्रेमींनी जाब विचारावा असे आवाहन केले. शिवाय आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शाब्दिक धुलाई देखील केली. प्रचंड वेगाने व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे मडेगिरी यांची पळता भुई थोडी झाली. रातोरात तातडीने सर्व फ्लेक्स उतरवण्यात आले. तसेच आज त्यांनी (सोमवारी) जाहीर माफी मागत अशी चूक भविष्यात होणार नाही अशी ग्वाही शिवप्रेमींना देत पोलिस ठाण्यातही पत्र दिले. झालेली चूक ही प्रिंटींग मिस्टेक होती असा निर्वाळा दिला आहे.



