पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे गेल्या सहा महिन्यांत १३ लाख १५ हजार १४४ दस्तांची नोंदणी झाली आहे. या दस्त नोंदणीतून राज्य शासनाच्या तिजोरीत तब्बल १७ हजार ४१९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. या आर्थिक वर्षांत शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागाला ३२ हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पहिल्या सहामाहीत उद्दिष्टाच्या ५४ टक्के एवढा महसूल प्राप्त झाला असून, मालमत्ता खरेदी-विक्री तेजीत असल्याचे चित्र आहे.
राज्याला महसूल मिळवून देण्यात वस्तू व सेवा करानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा क्रमांक लागतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, ऑनलाइन भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे.
राज्यामध्ये शहरीकरण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठय़ा प्रमाणावर सदनिका खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. तसेच पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिक या शहरांत मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण होत आहे. यामुळे दस्त नोंदणीतून सरकारला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळत आहे.



