पिंपरी (प्रतिनिधी) – पिस्टल घेऊन वावरणाऱ्या तडीपार गुंडास गुंडा विरोधी पथकाने अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. ४) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नागेश्वर मंदिराजवळ, मोशी येथे घडली.
चंदन सुरेंद्र सिंग (वय ३५, रा. गणेश नगर, डांगे चौक, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी विजय तुकाराम गंभीरे (वय ३५) यांनी मंगळवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी चंदन सुरेंद्र सिंग हा ‘मीच आहे पिंपरी चिंचवडचा भाई चंदनसिंग, मला कोणी डिवचले तर मी एकेकाला गोळी घालून संपून टाकेल. माझ्या नादाला लागू नका,’ असे मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करत दहशत करीत होता.
याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसे असा ४२ हजारांचा ऐवज मिळून आला. आरोपी चंदन सिंह याला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो पिंपरी चिंचवडमध्ये आला असताना मिळून आला.




