पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) – हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा नारा देत शिवसेना प्रबळ करण्यासाठी योगदान देणा-या शिवसैनिकाला, खासदारांना, आमदारांना व पदाधिका-यांना जय सोनिया… जय राहूल गांधी… जय शरद पवार… हे म्हणायला भाग पाडत असाल तर तो शिवसैनिक कदापी सहन करणार नाही. त्यामुळे अशी वाईट परिस्थिती निर्माण होते, अशा परखड शब्दांत वने, सांस्कृतीक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना व साई इंडस्ट्रीयल इस्टेट (चोविसावाडी, च-होली) यांच्या वतीने चोविसावाडी येथील डीपी रस्त्याबाबत चर्चा करण्यासाठी उद्योजकांसोबत काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये उद्योजकांची बैठक पार पडली. तत्पुर्वी त्यांनी शिवसेना व उध्दव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर जोरदार तोफ डागली. यावेळी लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, भाजपाचे प्रदेश सदस्य सुनिल सिंह, एल. पी. मोर्या, दिनकर मिश्रा, नागेश सूर्यवंशी, सोनु सिंह, अमोद शिरोडकर, प्रताप इंदलकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. मात्र, शहरातील भाजपाचा एकही पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीला उपस्थित नव्हाता.
मुनगंटीवार म्हणाले, ते (उध्दव ठाकरे) माझे माजी मित्र आहेत. त्यांच्यावर अशी वेळ येणं हे त्यांचे प्रायश्चित्त आहे. कारण, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकाला स्वाभिमान शिकवला. हातात भगवा झेंडा घेऊन हिंदुत्वाचा विचार शिकवला. त्याच पक्षाच्या पदाधिका-याला खासदारांना, आमदारांना जर कॉंग्रेसची विचारधारा जपण्याची शिकवण मिळत असेल. तर, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाने प्रेरित झालेला शिवसैनिक ते कदापी सहन करणार नाही. यामुळे ठाकरे यांच्यावर अशी वाईट परिस्थिती ओढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्यापेक्षा त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सच्चे शिवसैनिकच दुकान बंद करणार
विश्वगौरव, देशगौरव, राष्ट्रगौरव नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आग ओकण्याच्या ऐवजी ज्यांनी आजपर्यंत स्वतंत्र्यवीर सावरकरांचा विरोध केला. एकोणीस महिने लोकशाहिची हत्त्या करत निरपराध लोकांना जे नमस्ते सदावत्सले म्हणतात, देशाला प्रणाम करतात, महिलांना मातृभूमी म्हणतात, देश आमचा परिवार आहे असं समजतात, त्यांना जेलमध्ये टाकलं. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. स्व. बाळासाहेब म्हणाले होते, ज्या दिवशी कॉंग्रेससोबत जाऊन बसण्याची वेळ येईल. त्या दिवशी हे दुकान बंद करेण. त्यांचं तुम्ही (उध्दव ठाकरे) ऐकलं नाही, कॉंग्रेससोबत गेलात. आता हे दुकान बंद करण्याचं काम स्व. बाळासाहेब यांचे सच्चे शिवसैनिक पूर्ण करत आसतील, तर आता पत्रकार परिषदा घेऊन काय फायदा. शेवटी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचा विचाराचा विजय ख-या शिवसैनिकांच्या माध्यमातून होणार आहे, असाही टोला मुनगंटीवार यांनी लगावला.




