मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवा, ही भाजपचीच चाल आहे. कारण, भाजपला देशपातळीवर अन्य राजकीय पक्ष नको आहेत. देशपातळीवर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व उदयास आले होते. ते थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाने कुणाच्या तरी दबावाखाली शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. असा आरोप महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह 24 तासांत गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे शिवसेनेला स्वतंत्र प्रपंच आहे. शिवसेना फक्त आमदार आणि खासदार नाही. खरी शिवसेना म्हणजे तिचे प्राथमिक सदस्य, शाखाप्रमुख, तहसीलप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपनेते. जनतेतून निवडून आलेले 55 आमदार आणि 22 खासदार शिवसेनेचेच आहेत, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण शिवसेना ही जनतेची आहे. अंधेरी निवडणुकीत शिवसेना पुन्हा ताकदीने उतरेल आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा दावाही दानवे यांनी केला.



