मेहसाणा – आपण आता विजेचे बिल भरणार नाही तर वीज विकू आणि त्यातून पैसेही मिळवू. एक काळ असा होता की सरकार नागरिकांना विजेचा पुरवठा करायचे. मात्र आता सौर पॅनल स्थापन झाल्यामुळे नागरिक स्वत:च विजेचे उत्पादन करतील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
आपल्या तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांनी १४,६०० कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शुभारंभ व पायाभरणी केली. त्यात मेहसाणाच्या मोढेरा येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मोढेरा या गावाला पहिले सौर ग्राम घोषित केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की मोढेरा सूर्य मंदिरासाठी ओळखले जाते.
मात्र आता ते सौर ग्राम म्हणून ओळखले जाईल. कारण हे पूर्ण गावच आता सौर उर्जेवर चालणार आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार स्वच्छ उर्जा योजने अंतर्गत या गावात एक सौर उर्जा संयंत्र स्थापन करण्यात आले आहे.




