मुंबई : अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर वेगवगेळ्या स्तरांमधून प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनाही प्रसारमाध्यमांना तसेच समाजमाध्यमांवरुन टीका टीप्पणी केली आहे.
मात्र हे पक्षाध्यक्ष असणाऱ्या राज ठाकरेंना फारसं रुचलेलं नाही. त्यामुळेच त्यांनी समाजमाध्यमांवरुन मनसेच्या कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं आहे. मात्र याच आवाहानामुळे लोकांना मनसेबरोबरच मनसेच्या नेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केल्याचं या पोस्ट खालील कमेंट्समध्ये दिसून येत आहे.
राज ठाकरेंनी रविवारी रात्री आठ वाजल्यानंतर समाजमाध्यमांवरुन एक पोस्ट केली. यामध्ये राज यांनी, “सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये,” असं म्हटलं आहे. तसेच, “मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन,” असंही राज यांनी म्हटलं आहे.



