पिंपरी (प्रतिनिधी ) खांबाजवळ बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात एकाने लाथ घातली. त्यामुळे व्यक्तीचे डोके खांबावर जोरात आदळले. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ९) रात्री आकुर्डी येथे घडली.
मोहन बन्सराज प्रसाद गौतम (वय ३५, रा. आकुर्डी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जगतपाल बाबू शेट्टी (वय ५८, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश पिराजी खाडे (वय ३२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री मोहन हे किरण ज्वेलर्स समोरील विजेच्या खांबाजवळ बसले होते. त्यावेळी मोहन आणि आरोपी महेश यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. महेश याने मोहन यांच्या डोक्यात जोरात लाथ मारली. त्यामुळे मोहन यांचे डोके विजेच्या खांबाला धडकले आणि ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा याबाबत गुन्हा दाखल केला आहे.




