मुंबई : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानांतर्गत ते विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. या अभियानांतर्गत तुषार गांधींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळं मात्र राजकीय चर्चेला उधाण आलं.
तुषार गांधींसह फिरोज मिठीबोरवाला यांनी या अभियानांतर्गत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना प्रवक्त्या डॉ मनीषा कायंदे या प्रसंगी उपस्थित होत्या. या अभियानात डॉ. जी. जी. पारीख, मेधा पाटकर यांच्यासह देशभरातील इतर आघाडीच्या आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे.
आम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आमची एकजूट दाखवण्यासाठी आलो आहोत. आपली लोकशाही, आपला देश वाचवण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न म्हणून ‘नफरत छोडो, संविधान बचाव’ अभियानात शिवसेनेला सहभागी करून घेण्याचं आवाहनही आम्ही त्यांना केलं आहे,” अशी माहिती या भेटीनंतर तुषार गांधी यांनी दिली.


