मुंबई : शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे यांनी शिंदेंच्या मेळाव्यात हजेरी लावली. तर जयदेव यांचे सुपुत्र जयदीप ठाकरे यांनी आता तरी ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र यायला हवे अशी इच्छा व्यक्त केली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयदीप ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली. तर उद्धव ठाकरेंनी जबाबदारी दिल्यास राजकारणात सक्रिय होऊन काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. जयदीप ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू असून या आधी देखील त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे चिन्ह आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचे चिन्ह आहे. त्यामुळे जे झालंय ते फारच वाईट झालंय. हा फक्त ठाकरे कुटुंबावर घाला नसून मराठी माणसाच्या प्रत्येक कुटुंबावर हे झालं आहे. अशावेळी इतर ठाकरेंनी देखील एकत्र आलंच पाहिजे, मराठी माणसं आपापसात लढताहेत अशावेळेला कुटुंबीयांनी एकत्र यायला पाहिजे, पण हे त्यांच्या मनात असलं पाहिजे एकत्र यायचं का नाही. असं स्पष्ट मत जयदीप ठाकरेंनी व्यक्त केले. मशाल हे क्रांतीचे प्रतीक आहे आणि शिवसेना नक्की क्रांती घडवेल, असा विश्वासदेखील जयदीप ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.



