देहूगाव ( वार्ताहर ) दिवाळीतील फटाके विक्रेत्यांसाठी देहू नगरपंचायतीने इंद्रायणी नदी घाटावर फटाका स्टॉल ( दुकाने ) उभारण्यासाठी जागा निश्चित केली आहे. शासकीय नियमांचे पालन करीत स्टॉल धारकांनी नगरपंचायतीचे रितसर परवानगी घेऊन फटाके स्टॉल उभारण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. राज्य सरकारने सण, उत्सवावरील सर्व निर्बंध उठविल्यामुळे सण,उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतआहे. आता नागरिकांना दिवाळी या सर्वात मोठ्या सणाची उत्सुकता लागली आहे. यंदा मोठया उत्सवात दिवाळीला सुरूवात होत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायतीच्या हद्दीत विविध भागात फटाके स्टॉल उभारले जातात.
नगरपंचायत प्रशासनाने इंद्रायणी नदी घाटावर स्टॉल धारकांसाठी जागा निश्चित केली आहे त्यासाठी स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात येत आहे.दुर्घटना अथवा आगीच्या घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करीत फटाका स्टॉलशेजारी वाळू , अग्निशामक यंत्र ( अग्निविरोधक सिलेंडर),पाण्याची व्यवस्था ठेवावी. स्टॉल परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवू नये.




