मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावलेली उपस्थिती लक्षणीय ठरली. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे संबोधित करण्यासाठी उठले असता सभागृहात घडलेल्या एका प्रकाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) October 13, 2022
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मंचावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह अनेक नामवंत हस्ती उपस्थित होत्या. शिवसेना व छगन भुजबळ यांच्यातील नातं लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी या कर्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशातच उद्धव ठाकरे भाषणासाठी उठले अन् सभागृहात उद्द्भव ठाकरे यांच्या नावाचा एकच जयघोष सुरु झाला.
ठाकरे यांनी आपल्या भाषणास सुरुवात केल्यानंतर देखील उपस्थितांनी शिट्ट्या व टाळ्यांचा कडकडाट सुरूच ठेवला. भुजबळ यांच्या अभीष्टचिंतनासाठी आले असताना मिळालेल्या या उस्फुर्त प्रतिसादामुळे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर देखील याचा आनंद झाल्याचं दिसलं.
ठाकरे मंचावर येऊन अर्धा मिनिट ओलांडल्यानंतरही उपस्थितांकडून जयघोष व शिट्ट्या, टाळ्यांचा कडकडाट सुरूच असल्याने अखेर शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली. मंचावर बबसलेल्या शरद पवार यांनी, हात उंचावून उपस्थितांना आता उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु झाले आहे, शांतपणे ऐकून घ्या असा इशारा केला. शरद पवार यांच्या सूचनेनंतर उपस्थितांनी सभागृहात शांतता कायम केली.



