पिंपरी : दिवाळी सणानिमित्त महापालिकेतील ठेकेदारांसह पदाधिकारी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देतात. परंतु, महापालिकेत अशा प्रकारे भेटवस्तू वाटपास दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मनाई केली आहे. तसे आदेश नवे कारभारी आयुक्त शेखर सिंह यांनी काढले आहेत.
तसेच जे अधिकारी व कर्मचारी भेटवस्तू घेताना आढळतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका सिंह यांनी दिला आहे. दिवाळीमध्ये भेटवस्तू स्वीकारणेच्या प्रथेला चाप बसविण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील कलम १२ नुसार नियमांचा आधार घेत गुरुवारी (दि. १३) एक परिपत्रक जारी केले आहे.
या संदर्भात सुरक्षा विभागाने अशा भेटवस्तू घेऊन येणाऱ्यास कार्यालयात मज्जाव करावा, अशा प्रकारच्या भेटवस्तू महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले आहे. मात्र यामध्ये पालिका आवारात अथवा महापालिकेच्या आवाराबाहेर असा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेतील हुशार कर्मचारी व अधिकारी महापालिकेच्या बाजूला अवैद्य गाडी पार्क तळामध्ये दरवर्षी अनेक ठेकेदार अधिकारी कामावरून सुटल्यानंतर भेटवस्तू देतात त्याला महापालिका आयुक्त काहीच करू शकत नाहीत.
मागील काही वर्षापासून प्रत्येक दीपावलीच्या सणामध्ये असे शासनाचे परिपत्रक जारी करण्याचे नियम असल्याने महापालिका आयुक्तांकडून या पद्धतीने परिपत्रक जारी केले जाते. महापालिकेतील अनेक अधिकारी व ठेकेदारांची आर्थिक हितसंबंध असल्याने व काही अधिकारी थेट ठेकेदाराच्या गोटात सामील असल्यामुळे तर काही अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी अनेक ठेकेदार दरवर्षी सर्रास भेटवस्तूंची मेजवानी देतात. यात आयुक्त साहेबांनी घातलेल्या नियमांना बगल देत महापालिकेच्या गेटबाहेर या वस्तू अधिकाऱ्यांना व्यवस्थित पोहोच होतात. अशा अधिकाऱ्यावर आयुक्त यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही. तसेच यापूर्वी किती अधिकाऱ्यावर अशी कारवाई केली याची आकडेवारी ही महापालिका दप्तरी आढळली नाही. त्यामुळे केवळ प्रसिद्धी माध्यमांसाठी हे एक पत्रकच राहिले आहे.




