सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे तसेच कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. आता पुढच्या टप्प्यात शौचास पाळीव श्वान घेऊन रस्त्यांवर येणाऱ्या श्वान मालकांवर दंड आकारण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे. श्वान मालकांकडून पुढील महिन्यांपासून दंड आकारणी केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान मंगळवारी एका दिवसातच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून 85 हजार 50 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी आहेत. अनेक जण घरातील श्वानासह सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर फिरण्यास निघतात. श्वानांचा प्रातःविधी हाच सर्वांचा हेतू असतो. यामुळे शहरात अस्वच्छता पसरत असून आरोग्याच्याही समस्या निर्माण होत आहेत.
काही वर्षांपूर्वी नागपूर महानगरपालिका श्वान मालकांवर दंड आकारत होती. नंतर दंड आकारणेच बंद करण्यात आले होते. आता पुन्हा महानगरपालिकेने श्वान मालकांवर दंड आकारण्यासाठी नव्या नियमांसह पावले उचलण्याचा निर्धात केला आहे. त्यामुळे श्वान मालकांकडून मोठी दंड वसुली होणार आहे.
काय आहे नियम…..
पाळीव प्राण्याचे मालक असणे ही केवळ वचनबद्धता नाही तर जबाबदारी देखील आहे. पाळीव प्राण्यांच्या मलमूत्राने भरलेले फुटपाथ हे पादचारी आणि स्वच्छता कामगारांसाठी एक भयानक स्वप्न आहे. हे आरोग्यालाही घातक आहे. त्यात विविध प्रकारचे रोगजनक असतात जे मल गरम होईपर्यंत आणि कोरडे होईपर्यंत राहतात. विकसित जगात पाळीव प्राण्यांच्या पालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या नंतर उचलणे आणि स्थानिक कायद्यांनुसार मलविसर्जन करणे अनिवार्य आहे.



