पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या हाय वॅक्युम सक्शन मशीनच्या स्पेसिफिकेशनवरून घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर वैद्यकीय विभागाने याची चौकशी करण्यास साफ नकार दिला आहे.
स्वतः आमदारांनी आरोप केलेले असतानाही अधिकारी त्याला कात्रजचा घाट दाखवत आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी देखील मशीन आणि निविदेतील टेक्निकल स्पेसिफिकेशन तपासण्यास नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे या वादग्रस्त प्रकरणाच्या चौकशीची फाइल आयुक्तांच्या टेबलावर पडून आहे. आयुक्त शेखर सिंह याबाबत काय निर्णय घेणार की अधिकाऱ्यांना अभय देणार हे पहावे लागेल.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्णसेवा पुरवण्यासाठी नुकतेच वैद्यकीय विभागाने हाय वॅक्युम सक्शन मशीन खरेदी केल्या. टेक्निकल स्पेसिफिकेशननुसार निविदेतील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका पुरवठादारावर ठेवण्यात आला. निविदेतील अटी व शर्ती पात्र करत नसताना वैद्यकीय विभागाकडून मे. सेवर्ड सिस्टम्स आयएनसी या पुरवठादाराला पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे निविदेतील अटी व शर्तीचे उल्लंघन करून अधिका-यांनी पुरवठादाराला मशीन पुरवठा करण्याचे काम दिल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत वैद्यकीय विभागाने चौकशी करणे अपेक्षित असताना अधिका-यांनी साफ नकार दिला आहे.
याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवेदन काढून याप्रकरणी अधिकारी आणि ठेकेदार यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रत्यक्ष खरेदी करण्यात आलेल्या मशीन आणि निविदेतील खरेदी करण्यासाठीचे स्पेसिफिकेशन तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिका-यांना दिले होते. मात्र, स्पेसिफिकेशन तपासण्यास वैद्यकीय विभागातील अधिका-यांनी नकार दर्शवून ही फाइल अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या टेबलवर सरकवण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त वाघ हे देखील वादग्रस्त फाइल तपासण्याची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने आता ही फाइल आयुक्तांच्या टेबलवर पोहचल्याचे समजते. खरेदी केलेल्या मशीन आणि निविदेतील नमूद स्पेसिफिकेशन तपासून आयुक्त काय निर्णय घेतील, हे पहावे लागेल.




