पिंपरी ( दि. १७ ऑक्टोंबर) दिवाळीचा सण तोंडावर असताना आज रविवारी सुट्टीच्या दिवशी पिंपरी कॅम्प परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी एकच झुंबड केली होती. दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील व्यापारी हे वाहतूक समस्या आणि पथारी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे त्रस्त झाले आहेत. दिवाळीपूर्व खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी होत असताना पोलिसांच्या पार्किंग कारवाई, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई यामुळे ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही त्रास होत आहे.

ग्राहक आणि नागरिक यांनी गर्दी केल्यामुळे आणि ठप्प वाहनांचे गर्दी झाल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. खरेदीस येणाऱ्या ग्राहकांना गाडी पार्किंगसाठी मोठी समस्या होत होती. तर फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या हातगाड्यामुळे दुकानदारांना डोक्याला मनस्ताप सहन करावा लागत होता. अतिक्रमण विभागाची गाड्या आल्या की दुकानासमोर लावलेला माल आत बाहेर करून दुकानदारांचे दिवसभर तारांबळ उडत होती.

कोट्यावधी रुपये गुंतवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दारात पथारी आणि फेरीवाले अतिक्रमण करून व्यापाऱ्यांवरच दादागिरी करीत आहेत. हे अतिक्रमण काढण्यासाठी नेमलेले पथक निष्क्रिय ठरले आहे. या अतिक्रमणाबाबत तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्यावरच पोलीस कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. व्यापाऱ्यांच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, वाहतूक शाखेचे अधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी यावरती कायमचा तोडगा काढावा असे आवाहन व्यापारी संघटनेने केले आहे.




