कान्हे (वार्ताहर) मृत्यूनंतर स्मशानातही जागा मिळेना असे म्हणण्याची वेळ मावळ तालुक्यातील नायगाव (येवलेवाडी) येथील ग्रामस्थांवर आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असून एकीकडे संपूर्ण देश जरी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असला तरी जुन्या मुंबई-पुणे महार्गालगत असलेल्या येवलेवाडी येथील ग्रामस्थांची स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. हायवेलगत असलेल्या गावाला देखील मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने आपल्या पक्षाचा दिंडोरा पिटवणाऱ्या स्थानिक राजकारण्यांची मात्र कीव करावीशी वाटत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
२००५ यावर्षी ओढ्याच्या कडेला, २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये दौंडे कॉलनी येथील ओढ्याजवळ तर २०१७ पासून कधी डोंगराच्या कडेला तर कधी मोकळ्या मैदानात अंत्यविधी करावा लागत आहे. आपल्या परिवारातील सदस्य आपल्यातून निघून गेल्याचे दुःख विसरून त्याचा अंत्यविधी करण्यासाठी प्रत्येकवेळी जागेची शोधाशोध करावी लागत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी थाटामाटात येऊन नेतेमंडळी, स्वयंघोषित पुढारी श्रद्धांजली समर्पित करतात. मात्र स्मशानभूमीच्या जागेसाठी कोणीही समजासेवक व्हायला तयार नाही, अशी व्यथा येथील ग्रामस्थ मांडत करत आहे.
मावळ भागात बहुतांश गावात स्मशानभूमी अभावी नागरिकांना अंत्यविधी पावसात तसेच उन्हात करावा लागत आहे. काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाजूला निवारा शेड नसल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना तासनतास उन्हामध्ये बसावे लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी असे भयानक वास्तव आहे. काही ठिकाणी जागेच्या अडचणीमुळे स्मशानभूमी सुद्धा नाही असे चित्र आहे. परिणामी त्या ठिकाणी अंत्यविधी उघड्यावरच करावा लागत आहे. निवारा शेड नसल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना वाढत्या उन्हाचा तसेच अनियमित पडणाऱ्या अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, येवलेवाडी या ठिकाणी काही नागरिक ठिकाणी झाडांच्या सावलीत आसऱ्याला बसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या ठिकाणी अंत्यविधी होतो, त्या स्मशानभूमीत व बाजूला पडलेल्या सावलीचा आसरा घेताना बहुतांश महिला त्या ठिकाणी दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट एखाद्या झाडाचा आसरा घेऊन उभे राहावे लागते. दुःखात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करता ग्रामपंचायतीने व शासनाने पुढाकार घेऊन जागेचा प्रश्न सोडवून त्या त्या ठिकाणी निवाराशेड करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी दुःखात सहभागी होण्यासाठी येणारे नागरिक व ग्रामस्थांची आहे.
गावातील नागरिकांना अंत्यविधी करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. पावसामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन स्थानिक पुढारी, ग्रामपंचायत प्रशासन व शासनाने पुढाकार घेऊन स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करावी. – शरद शिंदे (स्थानिक ग्रामस्थ)
आम्ही प्रस्ताव पुढे पाठवला आहे. जागा उपलब्ध नसल्यामुळे स्मशानभूमीचे काम रखडले आहे. तत्काळ कोणी स्मशानभूमीसाठी जागा दिल्यास आम्ही ग्रामपंचायत फंडामधून स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर चालू करून घेऊ.
– सरपंच विजय सातकर




