पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणी प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे अधिकचे पाणी मिळणार असल्याने आंद्रा, भामा- आसखेड धरणातून २६७ एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. या प्रकल्पातून पाणी मिळणार याची चर्चा व प्रसिद्धी मागील पाच वर्षापासून सुरू आहे. आता नव्याने रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाचा नियमित आढावा घेण्यासाठी पाच जणांची समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. पुढील २० दिवसात पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलण्यात येणार आहे.
आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीमध्ये शहर अभियंता मकरंद निकम, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, नगररचना विभागाचे उपसंचालक आणि प्रकल्प सल्लागार असणार आहेत. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्वकांक्षी असलेला आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.




