पिंपरी, दि. ३० – डेंग्यू आटोक्यात आणा, त्यासाठी सगळ्या उपाययोजना काटेकोरपणे करा अशा सूचना आरोग्य विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेसह इतर पालिका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या भागात डेंग्यू वाढला त्या महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांना हे फोन करण्यात आले आहेत. महापालिकांच्या आरोग्य प्रमुखांना कॉल करून त्यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांचाही समावेश आहे.
शहरात डेंग्यूची बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पर्यायाने काही खासगी रुग्णालये बेड उपलब्ध नसल्याचेही सांगत आहेत. त्याविषयीची तक्रारही आरोग्य विभागाकडे आली आहे.
प्रत्यक्षात संबंधित रुग्णांचे प्लेटलेटस कमी झाले आहेत का, ते किती आहेत वगैरेची शहानिशा किंवा निरीक्षण न करताच किंवा सौम्य लक्षणे असतील तर, रुग्ण घरी राहून बरा होऊ शकत असेल तर रुग्णांना थेट रुग्णालयात दाखल करून घेणे नियमबाह्य असल्याची तंबीही खासगी रुग्णालयांना महापालिकेकडून देण्यात आली आहे. असे असतानाही सर्रास हे प्रकार होत आहेत.
याशिवाय डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. डासांची अळी, त्याचा फैलाव ज्या ठिकाणाहून होतो ते ब्रीडिंग पॉइंट शोधून ते नष्ट करावेत, अशा सूचना मुंढे यांनी दिल्या आहेत. दिवाळीदरम्यान त्यांनी पुणे विभागात जिल्ह्यातीलप्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये ज्या महापालिकांच्या हद्दीत डेंग्यूबाधितांची संख्या वाढत आहे, त्या महापालिकांच्या आरोग्य प्रमुखांना कॉल करून त्यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांचाही समावेश आहे.




