शिर्डी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोरदार कामाला लागला आहे. विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवस शिर्डीत चिंतन शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. आज शरद पवारांच्या भाषणाने शिबिराची सांगता होईल.
या कार्यक्रमात संबोधित करताना अजित पवार यांनी आपल्याच पक्षाचे नेते आणि माजी मंत्र्यांचे कान टोचले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचं काम करा. आपल्याला मंत्रीपद दिलं होतं याची जाणीव ठेवा. त्यामुळे ज्या नेत्यांना जिल्ह्यांची जबाबदारी दिलीय त्यांनी ती योग्यपणे पार पाडा, असा आदेश अजित पवारांनी दिला आहे
सरकार आपले नाही. आपण माजी मंत्री, माजी राज्यमंत्री आहात. ज्यांना जे जिल्हे दिले आहेत तिथे दुर्लक्ष करायचं नाही. तुम्हाला लाल दिवा दिला होता ते विसरू नये. सगळे सण झाले. आता एकच काम आहे, पक्षाचं काम केलं पाहिजे”, असं अजित पवार आपल्या नेत्यांना उद्देशून म्हणाले.
“आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या सुप्रीम कोर्टात याचिका आहे. महापालिका निवडणूक जैसे थे सांगितलं आहे पण ही स्थगिती कधीही उठू शकते”, असं अजित पवार म्हमाले.
“एक दोन महिन्यात निवडणूक लागू शकतात. त्यामुळे आपण तयार राहिले पाहिजे. राज्यात पुढच्या वर्षी २२१ नगर पंचायत, २५ जिल्हा परिषद, २३ महापालिका येणार निवडणूक होणार. त्याआधी डिसेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आहे. तिथे काम करावे”, असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
“स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यश लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वाट सोपी करणार. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येईल असा प्रयत्न करायचा आहे. जिथे आपण कमी असू तिथे आघाडी करू. काँग्रेस-शिवसेना बरोबर जाऊया”, असं पवार म्हणाले.
मागे ज्यावेळी २००२-२००७-२०१२ तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असायची जिथे आपली ताकद असायची. आपण कुठे एकटे लढायचो, जिथे नाही तिथे समविचारी लढायचो. जिल्हा पातळीवर निर्णय घेतला जायचा. असं मागे सूत्र असायचे. तसेच आता पुढे जावं लागेल. प्रांत स्तरावर निर्णय होईल. तो जिल्हा पातळीवर कळवला जाईल. पण तोपर्यंत वाट बघायची नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही एकटे लढायचे यासाठी तयारी करा आपली ताकद असेल तर मित्रपक्ष चर्चा करतील”, अशी माहिती अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली.
“ग्रामपंचायत वगळता कोर्टाने इतर निवडणूक जैसे थे सांगितलं म्हणून निवडणूक रखडल्या. पाऊस होतो म्हणून निवडणूक नको ही भूमिका घेतली होती. आता पावसाळ्यात निवडणूक घ्या, असे आदेश दिले मग स्थगिती आली’, असं पवार म्हणाले.
“सरकार गेले, आता-शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर निवडणूक बाबत सुनावणी झाली पण ती पुढे गेली. अजून प्रतीक्षा आहे. मतदार यादी बूथ प्रमुखांनी संपर्क साधला पाहिजे, ताकद दिली पाहीजे”, अशा सूचना अजित पवारांनी केल्या.
विधान परिषदेच्या पाच जागा निवडून आणायच्या आहेत’
“आपल्याला विधान परिषदेच्या पाच जागा निवडून आणायच्या आहेत. यासाठी आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. फेब्रुवारी 2023 मध्ये पाच विधान परिषद निवडणुका आहेत. शिक्षक, औरंगाबाद-कोकण, नाशिक पदवीधर, नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधर या निवडणुका पार पडणार आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
“आपला नागपूर आणि अमरावती येथे आमदार नाही. आपल्याला या जागा मिळवायच्या आहेत. औरंगाबाद राष्ट्रवादीकडे आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा मित्र पक्षाकडे आहे. मित्र पक्ष काँग्रेसकडे नाशिकची जागा आहे. अमरावतीची जागा विरोधकांकडे आहे. आपल्याकडे या जागेसाठी उमेदवार आहे. याबाबत मित्र पक्षांसोबत चर्चा करू. यासाठी बैठक आयोजित केली होती. पण काँग्रेस नेते नाना पाटोले आणि बाळासाहेब थोरात येऊ शकले नाही. ते यात्रेत व्यस्त आहेत. त्यांनी सांगितल नंतर निर्णय घेऊ”, असं पवार म्हणाले.



