नवी दिल्ली – अमेरिकेच्या व्याजदरवाढीमुळे काल सोने आणि चांदीच्या दरात घट झाली असतानाच चीन मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत असल्याचे वृत्त आल्यानंतर जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ झाली.
दिल्ली सराफत सोन्याचा दर ६०४ रुपयांनी वाढून ५०,८६९ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर तब्बल २,०६१ रुपयांनी वाढून ५९, ४७७ रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून १,६४८ डॉलर व चांदीचा दर १९.८१ डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. एचडीएफसी सेक्युरीटीजचे दिलीप परमार यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढल्यानंतर भारतीय बाजारातही अपेक्षेप्रमाणे सोन्याचा दर वाढला.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, अमेरिकेने काल व्याजदरात वाढ केली आहे. मात्र या आठवड्यात अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारी जाहीर होणार आहे. या कडेवारीकडे देशभरातील गुंतवणूकदाराचे लक्ष आहे. त्या आधारावर अमेरिकेच्या व्याजदरवाढीची पुढील दिशा ठरेल. मात्र जागतिक पातळीवर तणावाचे वातावरण असल्यामुळे सोन्याचे दर कमी होणार नाहीत असे बऱ्याच विश्लेषकांनी सूचित केले आहे. दरम्यान चीनसह अनेक देशांच्या रिझर्व्ह बँका सोने खरेदी करीत असल्याचे वृत्त आहे.



