कोपरगाव : अंगात ताप, हाताला बँडेज लावलेले अशा अवस्थेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शिर्डीत पोहोचले. राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा या शिबिरात हजेरी लावून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जाच निर्माण केली. शिबिरासाठी शरद पवार यांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा ‘देश का नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. खुर्चीवर बसूनच पवार यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त केले. उर्वरित भाषण माजी गृहमंत्री दिलीप वळसे यांना वाचायला सांगितले.

शरद पवार यांच्या हजेरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विधानसभेची आठवण झाली विधानसभेवेळी 80 वर्षाचा योद्धा मैदानात उतरल्यानंतर जो उत्साह संचारला होता तोच उत्साह पुन्हा दवाखान्यात असतानाही शरद पवार स्वतः अधिवेशनाला हजर राहिल्यामुळे कार्यकर्त्यांना मिळाला. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बूस्टर लॉस मिळाला असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
यावेळी शरद पवार केवळ चार ते पाच मिनिटे बोलले. ते म्हणाले की, राज्याच्या भागातून अनेक कार्यकर्ते अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. मी कालपासून शिबिरामधील सर्वांचे भाषण रुग्णालयात बसून ऐकले. आज मला सविस्तर बोलणे शक्य नाही, पण येत्या १५ दिवसांनंतर मी माझे नियमित काम सुरू करू शकतो. तसेच तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येने आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचे म्हणणे ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. राज्यात परिवर्तन करण्याची संधी आपल्याला मिळेल. आता पूर्ण ताकदीने पक्ष मजबूत करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी १५ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. असे असतानाही त्यांनी आज राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरास उपस्थिती लावली. शिबिराचा आजचा शेवटचा दिवस होता. शिबिर आटोपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहेत.



