पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपळे निलख येथील एका बांधकाम व्यवसायिकाने ६६ ग्राहकांना सदनिकेचा ताबा देण्यास दहा वर्षे टाळाटाळ केल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीनंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगाने बांधकाम व्यवसायिकाला चांगलाच दणका दिला आहे. तीन महिन्यात ग्राहकांना सदनिकांचा ताबा द्यावा. खरेदी रक्कमेवर वर्षीक सहा टक्के व्याज भरपाई द्यावी, असा आदेश आयोगाने दिला आहे.
राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्या. राम मौर्य आणि सदस्य डॉ. इंदरजित सिंग यांनी हा निकाल दिला. बांधकाम व्यवसायिकाने ग्राहकांना सदनिकेचा ताबा आणि भरपाईची रक्कम दिल्यानंतर सदनिकांचे अभिहस्तांतर करुन द्यावे, असेही आयोगाने निकालपत्रात नमूद केले आहे. याप्रकरणी सुलोचना सिटी होम बायर्स असोसिएशनने नांदगुडे पाटील डेव्हलपर्स कंपनी व तिचे संचालक विलास नांदगुडे (रा. पिंपळे निलख) यांच्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाद मागितली होती.
बांधकाम कंपनीने २००९ मध्ये पिंपळे निलख येथे सुलोचना सिटी नावाने गृह प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. तक्रारदार असोसिएशनच्या ६६ सदस्यांनी बुकिंग रक्कम देऊन सदनिका आरक्षित केल्या. ग्राहकांनी बांधकाम व्यवसायिकाच्या अटी शर्तीला अधीन राहून सदनिकेची ९५ टक्के किंमतही टप्प्याटप्प्याने जमा केली. ताबा दिनांक उलटून गेल्यानंतरही सदनिकांचा ताबा दिला नाही. त्यावर ग्राहकांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाद मागितली होती. बांधकाम कंपनीने आयोगासमोर लेखी युक्तीवाद केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक निवाड्यांचे दाखले देऊनही आयोगाने कंपनीचा दावा फेटाळून लावला.




