नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजीयम पद्धतीच्या (न्यायाधीशांची निवड करण्याची प्रक्रिया) केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी केलेल्या विधानांमुळे अगोदरच चर्चांना तोंड फुटले असताना आता भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यात उडी घेतली आहे. रिजीजू यांनी अगोदर आपल्या पक्षातील पद्धती दुरुस्त करावी, असा सल्ला स्वामी यांनी त्यांना दिला आहे.
आपण माजी कायदा मंत्री असल्याचे रिजीजू यांना स्मरण करून देत स्वामी म्हणाले की जर तुम्हाला उद्या पदावरून हटवले तर मला दोष देऊ नका. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाची कॉलेजीयम पद्धती अपारदर्शी असल्याचे कायदा मंत्र्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय कायदा मंत्री या नात्याने मी शेकडो वेळा न्यायालयांमध्ये युक्तिवाद केला आहे. मात्र मी सांगू शकतो की कॉलेजीयम पद्धतीपेक्षा मोदी सरकार अधिक अपारदर्शक आहे. रिजीजू यांनी ते ठिक करण्याकडे म्हणजे तेथे पारदर्शकता आणण्याकडे अगोदर लक्ष द्यावे.
स्वामी यांना राज्यसभा सदस्य म्हणून दिलेला बंगला त्यांची मुदत संपल्यामुळे काढून घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भातही सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे स्वामी नाराज आहेत. ते सरकारला सातत्याने लक्ष करणारे ट्विट करत आहेत.



