भारतीय क्रिकेटपटूंना परदेशात होत असलेल्या विविध टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळणार नाही, असे बीसीसीआयने जाहीर केले. यामागचे कारण देताना असे सांगितले गेले की, जर भारतीय क्रिकेटपटू अशा लीगमध्ये खेळले तर रणजी करंडकासह भारतातील अनेक देशांतर्गत स्पर्धा संपुष्टात येतील. मुळातच हा हास्यास्पद दावा आहे.
देशांतर्गत स्पर्धामध्ये असे किती स्टार क्रिकेटपटू खेळतात. पृथ्वी शॉ, अरमान जाफर, सर्फराज खान, अजिंक्य रहाणे यांच्यासह काही असे खेळाडू खेळतात की ज्यांचा भारतीय संघाच्या निवडीदरम्यान कधीही विचार केला जात नाही. रणजी करंडक, हजारे करंडक, सय्यद मुश्ताक अली किंवा यासह भारतात होत असलेल्या विविध देशांतर्गत स्पर्धामध्ये गेल्या काही वर्षांत रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू खेळलेलेच नाहीत. जे खेळले ते भारतीय संघात आता कदाचित पुन्हा स्थानही मिळवू शकणार नाहीत. मग अशा खेळाडूंना परदेशातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिल्यावर देशांतर्गत क्रिकेटला धोका कसा पोहोचेल.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघ पराभूत झाला तेव्हा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनीच बीसीसीआयला आवाहन केले होते की नवोदित भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्या म्हणजे त्यांना सातत्याने अनुभव मिळेल व ते परिपक्क बनतील.
मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बीसीसीआयचीच बाजू लवून धरली. भारतीय संघात स्थान मिळवू शकतील असे साधारण ४० खेळाडू आहेत. त्यांनी सातत्याने आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी केली आहे. मात्र, सध्याच्या भारतीय संघातच त्यांना स्थान दिले जात नाही मग त्यांना त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी परदेशातील लीगमध्ये संधी मिळत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. उलट बिगबॅशसह जगभरातील लीगचे आयोजक या खेळाडूंना आपल्या संघात खेळवण्यास तयार आहेत.
कारण अशा लीगमध्ये जर भारतीय क्रिकेटपटू खेळले तर त्या लीगद्वारे आयोजकांना, प्रक्षेपण कर्त्यांना तसेच खेळाडूंना बक्कळ पैसा मिळेल व या लीगही जास्त लोकप्रिय होतील. बीसीसीआयने अशा खेळाडूंना परवानगी द्यावी ज्यांच्याकडे इंडिया मटेरियल किंवा प्रथम दर्जाच्या क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. याच अनुभवातून हे खेळाडू पुढील काळात भारतीय संघाला नवी उंची मिळवून देतील. संकुचित विचार करुन आयपीएलचाच डंका वाजवत राहण्यापेक्षा खेळाडूंच्या कामगिरीची व लोकप्रियतेची व्याप्ती वाढवण्याचा विचार केला जावा.



