मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारकडून पोलिसांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप करत सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आव्हाड यांनी राजीनामा न देण्याचे आवाहनही पवार यांनी केले.
अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत भाष्य केले. जितेंद्र आव्हाड यांनी 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने कंटाळून राजीनामा देतो असे म्हटले. जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा विनंती आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी केले. ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिलीत. हे लक्षात घेता आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये असे अजित पवार यांनी म्हटले.



