कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा ।
चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥
ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥
चालविली जड भिंती । हारली चांग्याची भ्रांती । मोक्षमार्गाचा सांगाती । ज्ञानोबा माझा ॥
रेड्यामुखीं वेद बोलविला । गर्व द्विजांचा हरविला । शांतिबिंब प्रगटला । ज्ञानोबा माझा ॥
गुरुसेवेलागीं जाण । शरण एका जनार्दन । चैतन्याचें जीवन । ज्ञानोबा माझा ॥
संत ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारीसाठी पाच लाखापेक्षा जास्त भाविक तीर्थक्षेत्र आळंदीत दाखल झाले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वारी सोहळा होत असल्याने अलंकापुरीत एकादशीच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. पंचक्रोशीत चोहीकडे हरिनामाचा गजर सुरू आहे. ठिकठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. एकादशीच्या दिवशी राज्यभरातून आलेले पालखी सोहळे, दिंड्या, भाविक दिवसभर नगरप्रदक्षिणा करत असल्याचे दिसून आले.
यावेळी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली होती. माऊली…माऊली… पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम… निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम… ज्ञानोबा तुकोबा एकोबा… असा जयघोष ठिकठिकाणी ऐकू येत होता. डोक्यावर तुलसी घेतलेल्या महिला, गळ्यात वीणा, टाळ, पखवाज अडकवलेले भाविक सर्वत्र दिसत होते. सर्वांच्या मुखात हरिनाम होते. परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

इंद्रायणी घाटावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी
कार्तिकी एकादशीनिमित्त माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रविवारी (दि. 20) पहाटेपासूनच स्नानासाठी इंद्रायणी घाटावर मोठी गर्दी झाली होती. कडाक्याच्या थंडीतही भाविक इंद्रायणीत डुबकी मारत होते. इंद्रायणीच्या दुतर्फा स्नानासाठी गर्दी झाली होती.
– श्रींची पालखी आणि दिंड्यांची नगरप्रदक्षिणा
एकादशीसाठी आलेले भाविक सकाळपासूनच नगरप्रदक्षिणा करत होते. विविध दिंड्याच्या प्रदक्षिणा सुरू होत्या. दुपारी 2 वाजताच्या सुमारास माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणासाठी मंदिराबाहेर आली त्यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. खांद्यावर पताका, गळ्यात वीणा, टाळ, पखवाज, डोक्यावर तुलसी घेऊन महिला पुरुष नगरप्रदक्षिणा करत होते.
-वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, चाकण रस्ता, पुणे रस्ता, देहू रस्ता भाविकांनी तुडुंब
वारीला आलेले भाविक आळंदी शहरासह आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे शहराला जोडणारे वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, चाकण रस्ता, पुणे रस्ता, देहू रस्ता भाविकांनी तुडुंब भरलेले होते. टाळ, पखवाजाच्या निनादात भाविक, वारकरी हरिनामाचा जयघोष करत होते. सर्व रस्त्यांवर भाविक ये-जा करत होते.
पंचक्रोशीत हरिनामाचा गजर –
माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील सर्व धर्मशाळा, वारकरी आश्रमामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रंदिवस हरिनामाचा गजर सुरू आहे. काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम सुरू असून सर्वत्र माऊली आणि विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. ज्या भाविक, वारकरी यांची राहण्याची कुठेही सोय नाही असेही अनेक भाविक आळंदी पंचक्रोशीत मिळेल त्याठिकाणी, उघड्यावर, टेम्पोतच धार्मिक कार्यक्रम करत होते.
माऊली मंदिरात आज होणारे कार्यक्रम –
कार्तिक वद्य द्वादशी सोमवार दि. 21 पहाटे 2 ते 3.30 पवमान अभिषेक व दुधारती. पहाटे 3.30 ते 4 खेड तालुका प्रांत यांच्या हस्ते पंचोपचार पूजा. पहाटे 3 ते 6 नांदेडकर मंडळींची दिंडी क्र. 15 यांच्या वतीने मुक्ताई मंडपात काकडा भजन. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. दुपारी 4 ते सायं. 7 रथोत्सव. दुपारी 4 ते 6 ह.भ.प. हरिभाऊ बडवे यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन. रात्री 8.30 पालखीचे मंदिरात आगमनानंतर धूपारती. रात्री 9 ते 11 ह.भ.प. केंदूरकर महाराज यांच्या वतीने कीर्तन. रात्री 11 ते 12 श्रींचे गाभाऱ्यात पास धारकांसाठी खिरापत पूजा, प्रसाद वाटप. फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप, आदी कार्यक्रम होणार आहेत.




