कोल्हापूर : वाढदिवस म्हणजे एजंटांसाठी पर्वणी असते. लॉकडाऊननंतर निर्बंध शिथिल झाल्याने गतवर्षी जुलै 2022 मध्ये काठमांडू (नेपाळ) येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये वाढदिवसाचा शाही सोहळा पार पडला. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबईसह कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात येथील एक हजारावर प्रमुख एजंटांना निमंत्रित करण्यात आले होते. तीन दिवस रंगलेल्या शाही सोहळ्यांवर कोट्यवधीचा चुराडा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सौभाग्यवतींच्या नावे गुंतवणूक!
शासकीय कचेर्यात मोठ्या पगाराच्या नोकर्या करणार्या अधिकारी, कर्मचार्यांनाही अल्पकाळात मिळणार्या दामदुपटीचा मोह नडला. महिन्यापूर्वी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्याने कंपनीतील देवघेवीच्या वादातून एजंटाला मारहाण करून संबंधितांकडून धनादेश घेतले. विशेष म्हणजे हा सारा प्रकार पोलिस ठाण्यात घडला. संबंधिताने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे. सरकारी कचेर्यातल्या बाबूंनी दक्षता घेत सौभाग्यवतींच्या नावे उलाढाली केल्याचे समजते.
फोर व्हीलर, टू व्हीलर गिफ्ट!
कंपनीची तिजोरी झटपट भरण्यासाठी एजंटांसह गुंतवणूकदारांना विविध आकर्षक व भेटवस्तूद्वारे भुरळ घालण्यात येत असते. 15 लाखांच्या गुंतवणुकीवर चारचाकी, 10 लाखाला दुचाकी तर 5 लाखांसाठी मोपेड गिफ्ट दिली आहे. अडीच हजारावर चारचाकी, साडेतीन हजारावर दुचाकी तसेच साडेचार हजारावर मोपेडचे साखळीला वाटप केल्याने अल्पावधीत कंपनीने साडेपाच हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय कोट्यवधीची उलाढाल देणार्या साखळीला कुटुंबीयांसह बँकॉक, श्रीलंका, मलेशिया, दुबईसह अन्य देशाची परदेशवारी घडवली आहे.
नोटाबंदीनंतर झपाट्यात अडीचशे कोटींची उलाढाल!
अल्पकाळात दामदुप्पट, एव्हाना तिप्पट कमाईच्या आमिषाचे गाजर दाखविणार्या कंपन्यांच्या कमाईचा धंदा नोव्हेंबर 2016 मध्ये वाढीला लागला. या काळात नोटाबंदी झाल्यानंतर हजार आणि पाचशेंच्या जुना नोटा खपविण्यासाठी सार्यांचीच धावपळ उडाली. एजंटांसह साखळीने नेमके त्याचाच फायदा उठविला. गुंतवणूकदारांना दामदुपटीचे गाजर दाखवून त्यांनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या काळात कंपनीच्या शाहूपुरी येथील मुख्यालयासह तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्वच कार्यालयांत रांगा लागल्याचे चित्र होते. अवघ्या काही दिवसात अडीचशे कोटीपेक्षा जादा रक्कम कंपनीच्या तिजोरीत जमा झाल्याचे सांगण्यात येते.



