शिर्डी : मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीला जावून साईबाबांचं दर्शन घेतलं. मुंबईत नियोजित बैठका असूनही त्यांनी सगळ्या बैठका अचानक रद्द केल्या आणि ते हेलिकॉप्टरने शिर्डीला पोहोचले. तिथे सपत्निक साईंचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होणं अपेक्षित असताना त्यांचा ताफा वळाला सिन्नरच्या मिरगावच्या शिवारात…. तिथे त्यांनी एका ज्योतिषी बाबाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र अचानक त्यांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या दिशेने रवाना निघाला. अचानक बदललेल्या राजकीय दौऱ्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
मुख्यमंत्र्यांच्या मिरगाव दौऱ्याची अत्यंत गोपनियता ठेवण्यात आली होती. मात्र माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले. तिथे मुख्यमंत्री एका ज्योतिषी बाबाला भेटले आणि त्यांनी त्यांचं भविष्य जाणून घेतले, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री ज्या बाबाला भेटले ते भविष्यवाणी करत असल्याची माहिती आहे. म्हणून मुख्यमंत्री शिर्डीत आले आणि मिरगावात भविष्य पाहायला पोहोचले अशीच चर्चा परिसरात होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषकडून खरंच भविष्य जाणून घेतलं का? आणि भविष्य जाणून घेतलं असेल तर नेमकी काय माहिती विचारली? राज्यात पुन्हा राजकीय अस्थिरता येणार का? राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी पुन्हा गुवाहटीला जावे लागणार का? असे एक ना अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडले आहेत.



