मुंबई :- सध्याची परिस्थिती पाहिल्यास आपल्या देशाची वाटचाल हुकूमशहाच्या दिशेने चालली आहे. स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार आहोत. राज्य आणि केंद्राला समान अधिकार आहेत. राज्यघटना पायदळी तुडवून सत्ता पाहिजे यांना पहिले खाली खेचले पाहिजे. याबरोबरच सत्तापिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
दादरमधील प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचा आज शिवाजी मंदिरात लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचे संपादक सचिन परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशातील सध्यपरिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, इंग्रजांची निती होती तशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. जाती- धर्माच्या भिंती उभ्या करण्याचे काम सुरू आहे. वाटेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचे कटकारस्थान सध्या सुरू आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना खाली खेचले पाहिजे.
तसेच न्यायव्यवस्थेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. न्यायमूर्ती म्हणून सध्या जे बसले आहेत ते कसे आले आहेत ? कायदा मंत्री ज्या प्रकारे बोलतात ते त्यांचे वैयक्तिक मत आहे का? ते स्पष्ट केले पाहिजे. त्यांचा स्वभाव आहे की पिल्लू सोडायचं, ते मोठं झाले की मग पालकत्व स्वीकाराच, असा टोला त्यांनी लगावला.
लोकशाही विरुद्ध हुकूमशाही
महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांनीही धर्म नाकारला नाही. धर्म आवश्यक आहे, पण त्याच्या अधिन जाऊ नये असा त्यांचा समज होता. त्यांचं धर्माशी भांडण नव्हते, तर सामाजिक व्यवस्थेशी भांडण होते. त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केला. आपण समता आणि बंधुभावाचा बळी दिला म्हणून राष्ट्र म्हणून उभं राहू शकलो नाही. प्रबोधनकारांनी जातीच्या नावावर असणाऱ्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढला. समता बंधूभाव आणि एकमेकांबद्दल आपुलकी कशी निर्माण होईल यावर लिखान केले. आताच्या काळात धर्माचं भांडण सुरू झालेलं नाही तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असे भांडण सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


