पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने प्रसिद्ध केलेल्या भामा आसखेड जॅकवेल निविद्यावरून कमालीचे राजकारण तापले आहे. पालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निविदा प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात येत आहे यासाठी त्यांनी निदर्शनेही केले आहेत तर निविदा रद्द न केल्यास मोठ्या जनआंदोलनाचा इशाराही दिला आहे त्यानंतर या निविदा प्रक्रियेला भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही भ्रष्टाचार झाला असल्याचे म्हटले आहे. तर माजी पक्षनेते भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी मात्र शहरवासीयांच्या हक्काचे पाणी आढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणाला विरोध करत निविदेला सहमती दर्शविली आहे.
त्यामुळे प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबवणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. तर सदरच्या निविदेत राष्ट्रवादी काँग्रेस कडून आयुक्त शेखर सिंह यांना टार्गेट केले आहे. प्रशासनाच्या अडून भाजपचे नेते महापालिकेची लूट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावर एकनाथ पवार यांनी या कामात भ्रष्टाचार झाला असेल किंवा भाजपने त्याचा सहभाग असेल हे सिद्ध करावे मी राजकारणातून सन्यास घेईन असा उघड इशारा दिला आहे.
मात्र दुसरीकडे भाजपचे जेष्ठ नेते व विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी या भामा आसखेड जॅकवेल निविदेमध्ये 20 ते 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ई-मेल आयुक्तांना पाठवला आहे. या निवेदित सहभागी झालेल्या कंत्राटदाराच्या कागदपत्रांची पडताळणी करून कारवाई करावी अशी मागणी ही जगताप यांनी केली आहे. या सर्व घडामोडीमुळे पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. भाजपच्या दोन गटामधून वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा डोकेदुखी वाढणारी ठरणार आहे.




