पुणे – भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहाबे आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. यादरम्यान, चिंचवड येथील कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असताना त्यांना एका नगरसेवकाच्या घरातून बाहेर पडताना पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. घटनेनंतर शाईफेक करणाऱ्यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी व निदर्शने
या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, शाईफेक करणारे हे भाडेकरू गुंड होते. हिम्मत असेल तर नेत्यांनी समोर या. तसेच विरोधी पक्षांनी आता बोलावे की, राष्ट्रवादी, शिवसेने की, अशी झुंडशाही चालू देणार आहात का? अजित पवार यांना खुलं अपिल आहे की, घटनेची निंदा करा.. चंद्रकांत पाटील अशा घटनांना घाबरत नाही. उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांनी हे तरी म्हणावे की, ही घटना बरोबर नाही. या घटनेची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस करतील मात्र या चौकशीत कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांचे कुटुंब उद्धवस्त करण्याचे कारण नाही, असे मी फडणवीस यांना आवाहन करतो, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक झालेल्या शाही फेकामुळे भाजपचे कार्यकर्ते गोंधळले होते तर काही काळ तणावाचे वातावरण होते. महापुरूषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. त्यातच पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. शाईफेक करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.



