पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याची घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी चिंचवड येथे घडली. चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हा प्रकार केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी समता सैनिक दलाच्या तिघांना ताब्यात घेतले आहे.
मनोज भास्कर गरबडे, धनंजय भाऊसाहेब बिजगज, विजय धर्मा ओव्हाळ अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. ताब्यात घेतलेल्या तिघांना पोलिसांनी दुसरीकडे हलवले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून समर्थन केले.
आज चिंचवड येथे श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील चिंचवड येथे आले होते. शनिवारी सायंकाळी ते चिंचवड येथील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. तिथून उद्घाटन समारंभासाठी मोरया गोसावी मंदिराकडे जात असताना समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही महिलांनी त्याच परिसरात घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ ते दहा महिलांना ताब्यात घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात विधान केले. त्यावरून पाटील यांचा राज्यभर निषेध केला जात आहे. याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरातही उमटले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला. काही वेळेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील उद्घाटन समारंभासाठी पुढे मार्गस्थ झाले.
दोन्ही गट आमनेसामने……
.
शाई फेकल्याची घटना घडल्यानंतर चंद्रकांत पाटील समर्थक चिंचवड पोलीस चौकीत आले. त्याचवेळी समता सैनिक दलाचे कार्यकर्तेही तिथे होते. दोन्ही गट आमने-सामने आल्याने दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद उडाला. पोलिसांनी परिस्थिती हाताळत वाद मिटवला. दरम्यान काही काळ चिंचवड पोलीस चौकी समोर तणावाचे वातावरण होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात गर्दी केली. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मंत्री पाटील यांचा निषेध केला.




