पिंपरी – त्रिवेणी नगर, तळवडे येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पार्किंग मधील १५ दुचाकी जळून खाक झाल्या. यावेळी पहिल्या मजल्यावर अडकलेल्या तीन मुलांसह चार जणांची आणि एका श्वानाची सुटका अग्निशामक दलाने सुखरूपरीत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 12) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.
चेतन अंबादास सूर्यवंशी (वय 14), दिनेश अंबादास सूर्यवंशी (वय १२), अंबादास महादेव सूर्यवंशी (वय 42 ) आणि समीर शेट्टी (वय 17) अशी सुटका केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय एका श्वानाचीही अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटका केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉवर लाईन रोड, त्रिवेणी नगर येथील हाउसिंग सोसायटीत आग लागल्याची माहिती मध्यरात्री २.०७ वाजता मिळाली. त्यानुसार तळवडे अग्निशामक उपकेंद्र, प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्र, चिखली अग्निशामक उपकेंद्र आणि अग्निशामक मुख्यालय येथून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाला. पार्किंगमधील 15 दुचाकी पूर्णपणे पेटलेल्या होत्या. एकीकडे अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. तर दुसरीकडे पहिल्या मजल्यावर घरामध्ये अडकल्या चार जणांची सुटका केली.




