मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं. उद्घाटनाला चोवीस तास उलटत नाहीत तोच समृद्धी महामार्गावर पहिल्या अपघाताची नोंद झाली आहे. वायफळ टोल नाक्यावर स्लो स्पीडने जाणाऱ्या एका कारला मागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यात दोन्ही कारचं प्रचंड नुकसान झालं.
अपघातात सुदैवाने कोणीही जखमी नाही
आज दुपारी झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून दोन्ही कारचे मात्र मोठे नुकसान झालं आहे. कालच समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते आणि आज त्याच ठिकाणी अपघात झाला.
डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं
समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं. ‘आजच्या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात (Maharashtra) वेगाने काम करत असल्याचं दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण 24 जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील’ असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
समृद्धी महामार्गाचा 24 जिल्ह्यांना लाभ
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
पर्यटनवाढीलाही चालना
समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी 24 ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते यांमुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरुळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबी का मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक येणार आहेत.



