पुणे : भाजपचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अखेर नरमले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी माफी मागितली आहे. “महापुरुषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करत जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी आपला माफीनामा जाहीर केला आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले आहेत?
“मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी अशी सूचना त्यांनी केली. ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही . माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे असं पाटील यांनी म्हटले आहे.




