पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी, कर्मचारी पदोन्नती, बदल्या संदर्भातील तक्रारी, सेवानियमात बदल, पदोन्नती निकषात बदलासह अन्य तक्रारी परस्पर राज्य शासनाकडील विभांगाकडे सादर करतात. (PCMC News) ही कार्यप्रणाली कार्यालयीन शिस्तीत धरुन नाही. यापुढे महापालिके व्यतिरिक्त अन्य प्राधिकरणांकडे अर्ज परस्पर सादर करण्यात येवू नयेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर सुमारे साडेसात हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींसंदर्भात वैयक्तीक तक्रारी, पदोन्नती, बदल्यां संदर्भातील तक्रारी, सेवानियमात बदल, पदोन्नती निकषात बदल, अन्य प्रकारच्या तक्रारी असतात. अधिकारी, कर्मचा-यांनी आपल्या तक्रारी नियंत्रण अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे अभिप्रेत आहे. परंतु, काही अधिकारी, कर्मचारी थेट शासनाकडे परस्पर तक्रारी करतात. ही बाब प्रशासकीय कार्यप्रणाली विरुध्द असून कार्यालयीन शिस्तीस धरून नाही.
महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सेवाविषयक बाबींसंदर्भात वैयक्तीक तक्रारी, पदोन्नती, बदल्या संदर्भातील तक्रारी, सेवानियमात बदल, पदोन्नती निकषात बदल, अथवा अन्य प्रकारच्या तक्रारी नियंत्रण अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच सादर कराव्यात. (PCMC News) महापालिकेव्यतिरिक्त अन्य प्राधिकरणांकडे असे अर्ज परस्पर सादर करण्यात येवू नयेत. अन्यथा महापालिका प्रशासनास वेठीस धरणाऱ्या अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची कृती गंभीर स्वरुपाची ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन करणारी कृती ठरत असल्याने गैरवर्तणूकीबाबत अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त सिंह यांनी दिला आहे.




