पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी- चिंचवड महापालिकेत कार्यरत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आरोग्य संबंधी समस्या जाणवू लागल्याने काम करणे अवघड होते. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा, यासाठी अनुकंपा तत्त्वावर त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यात येते. वारसाला नोकरी दिल्यानंतर तोच वारसदार ज्या आई-वडिलांमुळे आयुष्यभराची नोकरी मिळाली, त्याच आई- वडिलांना सांभाळण्यास तयार होत नाही. परिणामी हे आई-वडील म्हणजेच महापालिकेचे माजी कर्मचारी पुन्हा पालिकेत आपली तक्रार घेऊन येतात. या तक्रारी आता इतक्या वाढल्या आहेत की त्यांचा निपटारा करण्यासाठी पालिकेच्या वतीने वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिका सेवेमधील कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे कमिटीच्या शिफारशी, अनुकंपा तत्वानुसार वारस नियुक्त्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना दिल्या जातात. अशा पात्र वारसदारांमार्फत स्वतःच्या कुटुंबीयांचा सांभाळ करण्याबाबत महापालिका सेवेत दाखल होण्यापूर्वीच स्वयंघोषित विविध बंधपत्रे तसेच प्रतिज्ञापत्रांची पूर्तता करुन घेण्यात येते. पात्र वारसदार व्यक्ती महापालिका सेवेत रुजू झाल्यानंतर मात्र कुटुंबीयांचा सांभाळ करत नाहीत, तसेच सेवेत दाखल होण्यापूर्वी दिलेल्या स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र किंवा बंधपत्रातील तरतुदींचा भंग करीत असल्याचे सेवानिवृत्त महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शास आणून दिले आहे.
अशा समस्या सोडविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे वारंवार तक्रार अर्ज प्राप्त होत आहेत. या तक्रारी सोडवण्यासाठी समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण आवश्यक आहे. प्राप्त होणाऱ्या अजांबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी व समुपदेशनाव्दारे तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका आस्थापनेवरील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्या समन्वयाने कामगार कल्याण विभागामार्फत यापुढे प्राप्त अर्जावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
या कामकाजासाठी कामगार कल्याण विभागाने वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्या सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय विभागाशी समन्वय साधावा. केलेले तक्रार निवारणाचा मासिक अहवाल अतिरिक्त आयुक्त (१) यांच्याकडे सादर करावा, असा आदेश प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी जारी केला आहे.




