पिंपरी : आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांचा महासत्संगाचा कार्यक्रम २ फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथे होणार असून या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड तीव्र विरोध करणार आहे. अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांचा दुर दुर पर्यंत कसलाही संबंध नसताना देखील रविशंकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर रामदासस्वामी हे स्वराज्याचे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज लढाया करुन थकून गेलेले आहेत आणि शिवाजी महाराजांनी आपला जिरेटोप व तलवार रामदासाच्या चरणी अर्पण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करून रामदासाने स्वराज्य घडवले आहे. तसेच रामदास शिवरायांना म्हणतो की शिवाजी शिपाई म्हणून माझं एक काम करशील का.?
अशा आशयाचा व्हिडिओ बनवून तो आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करुन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी गेल्या तीन वर्षांपासून वाकड पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे अनेक वेळा तक्रारीचे निवेदने दिलेली आहेत. याच मागणीसाठी काळे यांनी अनेक आंदोलने देखील केलेली आहेत परंतु अद्यापही श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
त्यामुळे श्री श्री रविशंकर यांनी २ फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथे येण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अन्यथा सदर कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करुन विरोध करणार असून त्यानंतर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास श्री श्री रविशंकर हेच जबाबदार राहतील असे निवेदन वरीष्ठ पोलिस निरीक्षक कळंब पोलीस स्टेशन,पोलीस अधीक्षक उस्मानाबाद,उपविभागीय अधिकारी कळंब,गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना सतिश काळे यांनी निवेदन दिलेले आहेत.




