पुणे : शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलीकडच्या दिवसांपासून सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवतांना आणि साधु-संतांबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील काही मंडळी आक्रमक झाले आहेत. तसेच, सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी टीका केली आहे. “आमच्या हिंदू देवी-देवतांवर आणि संत परंपरेवर टीका करणाऱ्यांना पक्ष भाड्याने चालवायला दिला की काय परिणाम होतो, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. देवी-देवतांचा आणि संतांचा अपमान करणारे आज पक्षाचे प्रवक्ते म्हणून राज्यभर भटकत आहेत. तसेच, आमच्या देवी-देवतांवर गरळ ओकत आहेत,” असे तुषार भोसलेंनी म्हटलं होतं.
यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली-पाटील ठोंबरे यांनी भोसलेंचा समाचार घेत भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. “सुषमा अंधारेंनी शिवसेना ( ठाकरे गट ) प्रवेश करून पाच महिने झाले. त्यांचे व्हिडीओ, ते फार जुने आहेत. तेव्हा वारकरी समाज आणि ह.भ.प महिला कुठे होत्या. हे वारकरी समाजाचे नसून शिंदे आणि भाजपाने तयार केलेले आहेत. कारण, शिंदे गट आणि भाजपाचा भांडाफोड सुषमा अंधारेंनी केला आहे,” असे रुपाली पाटील यांनी सांगितलं.



