लोणावळा : जैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या सिध्दक्षेत्र श्री. सम्मेद शिखरजी, झारखंड या प्राचीन जैनक्षेत्र स्थळाला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. झारखंड सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सकल श्री संघ लोणावळा, खंडाळा, वलवण यांच्यावतीने लोणावळा शहरात बुधवारी बंद पाळण्यात आला होता.
झारखंड सरकारचा वरील निर्णय तसेच सौराष्ट्र, गुजरात जैन धर्मियांचे अतिशय पवित्र असे तीर्थस्थळ असलेले श्री शत्रुंजय तीर्थ येथे काही असामाजिक तत्वांनी केलेल्या उपद्रवाचा निषेध नोंदविण्यासाठी जैन समाजाने बुधवारी भारत बंद पुकारला होता. या बंद ला पाठिंबा देण्यासाठी लोणावळा, खंडाळा, वलवण येथील संघ प्रमुखांनी बुधवारी लोणावळा खंडाळा शहरातील सर्व दुकाने व व्यवहार दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवले होते.
तसेच सकाळी 11 वाजता मावळा पुतळा चौकात एकत्र जमत तेथून लोणावळा शहर पोलीस स्टेशन व नगरपरिषद पर्यत मूक मोर्चा काढला. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे जैन समाजाच्या भावना सरकारपर्यत पोहचविण्याची विनंती समाजाच्या वतीने दोन्ही प्रशासनाला करण्यात आली. सदर मूक मोर्चात जैन समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते, व्यावसायिकव महिला भगिनी तसेच युवक सहभागी झाले होते.




