- भाजपचेचे मिंधे एकनाथ शिंदे”, “50 खोके माजलेत बोके”, “नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी.. घोषणांनी दणाणले पिंपरी चिंचवड
पिपरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भूखंडाचा श्रीखंड विधानसभेत बाहेर आणला आहे. त्याकडील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सुडबुद्धीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांचे विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.
जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात (शुक्रवारी) आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हायुवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक नाना काटे, पंकज भालेकर, शाम लांडे, राहूल भोसले, मयुर कलाटे, प्रसाद शेट्टी, विशाल वाकडकर यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. “भाजपचेचे मिंधे एकनाथ शिंदे”, “50 खोके माजलेत बोके”, “नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी” या जोरदार घोषणा यावेळी दिल्या गेल्या.
प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भूखंडाचा श्रीखंड विरोधकांनी उघडकीस आणल्यामुळे सूडबुद्धीने जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. अजित पवार आणि जयंत पाटील ही जय-वीरूची जोडी अधिवेशनात सरकार रुपी “गब्बर सिंग” यांना हातबल करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहेत,त्यांना धारेवर धरत आहेत. अजून पुढचे सात दिवस अधिवेशन चालणार असून या पुढच्या सात दिवसात अनेक भ्रष्टाचाराचे प्रश्न जनतेच्या समोर जयंत पाटील आणतील. या भीतीनेच त्यांच्या निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले “हिवाळी अधिवेशनाच्या काळात सभागृहात राज्यातील जनतेच्या विविध महत्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा केली जाते. परंतु, शेतकरी, वाढलेली बेरोजगारी, महागाई यावर अपयशी ठरलेला सत्ताधारी पक्ष आपले अपयश लपवण्यासाठी विनाकारण सभागृहाचे कामकाज चालू देत नाही. अनावश्यक विषय समोर आणून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे महापाप हे राज्य सरकार करत आहे. कारण नसताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे केलेले निलंबन हा लोकशाहीचा अपमान असून मुख्यमंत्र्यांचा भूखंड घोटाळा उघडकीस येईल. तसेच भाजप नेत्यांची पार्लमेंट ते पालिका भ्रष्टाचाराची मालिका याची पोलखोल होईल या भीतीने हे निलंबन केले असल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “जयंत पाटील यांचे निलंबन असंवैधानिक असून विरोधी पक्षातील प्रमुख नेते यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकार हिटलरशाहीच्या दिशेने वाटचाल करत असून पिंपरी-चिंचवड मधील सरकारचा विरोध करणारे आंदोलनकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. राज्य सरकार विरोधात आंदोलन कस काय झाले म्हणून शहरातील पोलिसांना निलंबित करण्यात आहे. तरुणांची बेरोजगारीचे प्रश्न,वाढती महागाई हा नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबत असल्याचा आरोप देखील शेख यांनी केला.




