मुंबई : महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. या कारणानेच महाराष्ट्रात तरुण मुलांची लग्नं होत नाहीत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार यांनी व्यक्त केले. बुधवारी पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात जनजागर यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेचं उद्घाटन झाल्यानंतर शरद पवार बोलत होते.
केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार आहे. या दोन्ही सरकारची नीती जनतेला महागाईत लोटण्याची आहे. सत्तेत येण्यासाठी मोठी आश्वासने दिली. मात्र ती पाळता येत नसल्याने आणि जनतेचं या विषयावरील लक्ष हटण्यासाठी जाणीवपूर्वक जातीपाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
राज्य सरकारमधील एका मंत्र्याने राज्यातील काही महापुरुषांनी भीक मागून शाळा सुरु केल्याचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातील नेते सोडा, सर्वसामान्य माणूसही कधी भीक मागत नाही. महाराष्ट्रीय माणूस हा श्रम करणारा आणि घामातून कमावणारा माणूस आहे, असा टोलाही शरद पवार यांनी भाजपला लगावला.


