तळेगांव दाभाडे – मिळकत कराच्या वसुलीसाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत कठोर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शहरातील ५३ रहिवासी तर २० बिगर रहिवासी मालमत्ता नगर परिषदेने अटकावून ठेवल्या आहेत. नगरपरिषदेकडून थकबाकी दारांची कुंडली काढण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाईची पावले पुढील काळात उचलली जाणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.
मिळकत कराच्या वसुलीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत धडक मोहिम सुरु असून याअंतर्गत ३१ डिसेंबर अखेरपर्यंत शहरातील ५३ रहिवासी मालमत्ता व २० बिगर रहिवासी मालमत्ता अशा एकूण ७३ थकबाकीदार यांच्या मालमत्ता अटकावून ठेवलेल्या आहेत. अटकावून ठेवलेल्या किंवा जप्त केलेल्या मालमत्तेच्या मालकाने / भोगवटादाराने ३१ मार्च २०२३ अखेर थकीत कराची रक्कम नगपरिषदेकडे जमा न केलेस महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५२ ते १५६ सदर मिळकतींचा योग्य कायदेशीर प्रक्रिया अवलंबून जाहीर लिलाव प्रस्तावित करणेचे नगरपरिषदेचे नियोजन असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
नगरपरिषदेचे मालमत्ता कराचे मोठे थकबाकीदार यांना जप्ती वॉरंट बजावले नंतरही कराची थकीत रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मिळकत सिल करणेची प्रक्रिया दि.१२ डिसेंबरपासून नगरपरिषदेमार्फत सुरु करण्यात आलेली होती. मागील महिन्यामध्ये नगरपरिषदेने ज्या मिळकतींची रक्कम रुपये ५० हजार पेक्षा जास्त मिळकतकराची थकबाकी आहे, अश्या एकूण ५९३ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावलेले आहेत.
सन २०२२-२३ अखेरपर्यंत मिळकत कराचे १०० टक्के उद्दिष्ट गाठणेसाठी नगरपरिषदेमार्फत विजय शहाणे व तुकाराम मोरमारे यांचे नियंत्रणाखाली २ वसुली पथक नियुक्त करणेत आलेले आहेत. जप्ती वॉरंट बजावलेपासून या पथकामार्फत एक कोटी एक्याऐंशी लाख रुपये रक्कम थकीत मिळकत करापोटी वसूल करण्यात आलेले आहेत.
आता रक्कम रुपये १० हजार पेक्षा अधिक थकीत मिळकत कर असलेल्या थकबाकीदारांना नगरपरिषद जप्ती वॉरंट बजावुन पुढील कार्यवाही सुरु करणार असलेच्या मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले. तरी जप्तीची व मिळकत सिल करणेची कटु कारवाई टाळणेसाठी मिळकतधारकांनी आपले कराची रक्कम त्वरित नगरपरिषदेमध्ये जमा करावी. असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




