खालापूर – कार्ला देवीचा दर्शन करून डोंबीवली येथील सहलीची बस जुन्या मार्गावरून बोरघाटातून शिंग्रोबा देवस्थानच्या विरुद्ध दिशेने उतरत असताना बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली असता मात्र सुदैवाने येथील लोखंडी रेलिंग आणि झाडाला बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून प्रवासी विद्यार्थी बालबाल बचावले. तातडीने मदतकार्य मिळाल्यामुळे सर्वाना सुखरूप गगनगिरी वृद्ध आश्रमात हलविण्यात आले आहे. बसचालकाच्या चुकमुळे महिन्याभरातील दुसरा अपघात असल्याने पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की च.रू.बामा म्हात्रे विद्यामंदीर, कोपर, डोंबिवली या शाळेची तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्याची सहल बस क्र.एम.एच -04 -एच.वाय -3571 मधून कार्ला देवीच्या दर्शनाला गेली होती. या बस मध्ये 6 शिक्षक व 64 विद्यार्थी एकविरा येथून दर्शन घेतल्यावर जुन्या पुणे – मुंबई हायवेवरून गगनगिरी आश्रम खोपोली येथे जात असताना शिंग्रोबा मंदीराच्या पाठीमागील घाटामध्ये त्यांच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने बस दरीच्या दिशेने जात असताना येथील लोखंडी रेलिंग व झाडाला धडकून अपघात झाला
या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी नाही. या सर्वांना ॲम्बुलन्सच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना गगनगिरी आश्रमात सुखरूप आणण्यात आले आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक गौरी मोरे, बोरघाट पोलीस यंत्रणेचे पी एस आय योगेश भोसले आणि महेश चव्हाण, आय.आर बी चे सेफ्टी ऑफिसर शिंदे आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड यांनी तातडीने उपायोजना राबवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.



