मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून विधानसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचे विविध ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सातारचे आमदार जयकुमार गोरे, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अपघाताच्या घटना ताज्या असताना आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचाही अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे.
त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
आमदार बच्चू कडू हे आज पहाटे 6 ते 6.30च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे बच्चू जागेवरच कोसळले. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला. डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला चार टाके मारण्यात आले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला बँडेज लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेचं काही कारण नसल्याचं सांगण्यात आलं.
दुचाकीस्वाराने धडक दिल्याने बच्चू कडू हे रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. या अपघातात बच्चू कडू यांना मुक्कामार लागल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, दुचाकीस्वाराबाबतची काहीच माहिती मिळाली नाही. पोलीस सूत्रांनीही याबाबत काहीच माहिती दिली नाही.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या आधी आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. गोरे यांच्या कारला मध्यरात्री अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याही गाडीला अपघात झाला. आता बच्चू कडू यांचाही रस्ता ओलांडत असताना अपघात झाला आहे.



