- पंढरपूरचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सक्षम दावेदारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आणि एक औद्योगिक केंद्र असलेल्या चिंचवड मतदासंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार करण्याची संधी सोडू नये. पंढरपूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा करण्याचा निर्धार आज पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ठराव एकमताने करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांसह वरच्या फळीतील सर्व नेते आक्रमक झालेले दिसून आले. शहरात महापालिकेसह विधानसभेत घड्याळाचा गजर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘एक्शन मोड’मध्ये असल्याने दिसून आले. तसेच शहरातील आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस मुळे आमदार झाले आहेत गेल्या अनेक वर्ष चिंचवड एका दहशतीच्या वातावरणात आहे त्यामुळे पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ना भीती… ना सहानुभूती ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करत निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा करत ही निवडणूक आपण जिंकू असा संकल्प केला आहे.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी ही निवडणूक महापालिकेची रंगीत तालीम म्हणून बघायला पाहिजे. आपले पक्ष संघटन मजबूत असून बूथ स्तरीय तयारी झाली असल्याचे म्हटले. शहरात आरएसएसचे प्राबल्य वाढत असल्याने या गोष्टींना अटकाव घालण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते भाऊसाहेब भोईर यांनी, एक महीना आपल्याला घरी जायचे नाही. पक्षाने कोणालाही उमेदवारी देऊ राष्ट्रवादी काँग्रेसला हा विजयश्री खेचून आणावयाचा आहे असे म्हणत सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. आता कोणाची भीतीही नाही आणि कोणाचीही सहानुभूतीही नाही असे प्रतिपादन केले.
महापालिकेचे मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका जिंकण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून, चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने आणि आता मी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोट निवडणूक लढणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
तर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी मागच्या १० वर्षात राष्ट्रवादीचा आणि अजितदादांनी केलेल्या कामाचा फायदा घेऊन पक्षाचे नुकसान करताना कोणी विचार केला नाही. आता पक्षाने देखील कोणाचा विचार करायची गरज नाही, असे स्पष्ट मत मांडले.
चिंचवडला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असणे हे येत्या महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहे. तसेच याठिकाणी निवडणूक झाल्यास कुठल्याही इतर पक्षांना ही जागा सोडण्यात येऊ नये. याठिकाणी घड्याळ याच चिन्हावर निवडणूक लढविण्यात यावी. असेही या प्रस्तावात म्हटले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपण बाहेरील उमेदवारास पाठिंबा दिला होता. पण राज्यातील आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच भाजपचे आक्रमक राजकारण पाहता आपण आपला हक्काचा मतदारसंघ कुठल्याही भावनिक कारणामुळे किंवा राजकीय अपरिहार्यतेसाठी इतर पक्षांसाठी सोडू नये. येत्या वर्षभरात महापालिका आणि लोकसभा अशा दोन मोठ्या निवडणुका पार पडणार आहेत, यासाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि पक्षवाढीच्या दृष्टीने ही जागा राष्ट्रवादीने लढवायला हवी, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.




