मुंबई : अवैध जात प्रमाणपत्राच्या आरोपांप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने झटका दिला आहे. मुंबईतील कोर्टाने या प्रकरणी नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. एवढचं नव्हे तर कोर्टाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना एक हजार रुपयांचा दंडही बजावला आहे. अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणात सुनावणीबाबत पुन्हा तहकुबी मागितल्याबद्दल विशेष कोर्टाने खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना हा दंड बजावला आहे. एवढचं नव्हे तर सुप्रीम कोर्टातील प्रकरण आणि मुलुंड पोलीस ठाण्यातील प्रकरण हे दोन्ही वेगळं असल्याचं निरीक्षणही शिवडीतील कोर्टाने नोंदवले आहे.
अवैध जात प्रमाणपत्राच्या आरोपांप्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात मुंबईतील शिवडी येथील कोर्टात खटला सुरू आहे. यापूर्वी या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने जून २०२१ मध्ये नवनीत राणा यांना झटका देत आपले जात प्रमाणपत्र सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. कारण हे प्रमाणपत्र अवैध मार्गाने मिळवल्याचा निष्कर्ष काढला आला होता. तसेच त्यांना दोन लाखांचा दंडही बजावला होता.
हायकोर्टाच्या निकालाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला २२ जून २०२१ मध्ये स्थगिती दिली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणांच्या निवडीला आव्हान देत २०१७मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेले जातीबाबतचे प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केलं होतं.

