पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना मंगळवार (दि. ३१) रोजी प्रसिद्ध झाली आहे. ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ( सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) नामनिर्देशन पत्र मजला, ग क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल करता येईल. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. उमेदवारांवरील दाखल गुन्ह्यांची माहिती उमेदवार, राजकीय पक्ष व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसार माध्यामांमध्ये प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
https://maharashtramaza.online/?p=163031
निवडणूक निर्णय अधिकारी अथवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारेच नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील. नामनिर्दे शन पत्र हे नमुना २ ब मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्राचा नमुना २ ब हा नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. उमेदवार स्वतः अथवा उमेदवाराचा सूचक असे नामनिर्देशन पत्र दाखल करु शकेल. एका उमेदवारास जास्तीत जास्त ४ नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील.
उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील असल्यास १० दहा हजार रुपये व अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ हजार रुपये रोख स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाकडे अथवा कोषागारामध्ये भरुन त्याची पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडावी लागेल. नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारांनी त्यांचे बँक खात्याच्या तपशील देणे बंधनकारक आहे. बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँक, को- ऑपरेटिव्ह बँक, पोष्ट ऑफीस येथे नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वीच्या किमान एक दिवस अगोदर सुरु केलेले असणे आवश्यक आहे. तसेच २० हजार रुपयांवरील सर्व खर्च हा या खात्यातून ऑनलाइन अथवा क्रॉस चेकच्या माध्यमातून व्यवहाराद्वारे केलेला असावा.




